नागपूर आरोग्य प्रशिक्षण केंद्र उपहारगृहातील 'विठ्ठल'
नागपूर अधिवेशन काळात मुक्कामाची व्यवस्था आरोग्य विभागाच्या प्रशिक्षण केंद्रात करण्यात येते. या प्रशिक्षण केंद्रातील उपहारगृहात गेली अनेक वर्षे विठ्ठल नावाचा हसतमुख, प्रामाणिक व्यक्ती कार्यरत आहे. विठ्ठल स्वतः उत्तम अस्सल नागपुरी स्वयंपाक बनवतो व सर्वांना अगदी आग्रहाने खाऊ घालत असतो. येथे जेवणाची थाळी घेतल्यानंतर अगदी मनसोक्त व भरपेट खाता येते. जेवणातील सर्व पदार्थ जितक्या वेळा हवेत तितके ते वाढण्यासाठी विठ्ठल नेहमीच तत्पर असतो. जेवणाचा उत्तम दर्जा व घरगुती चव यामुळे येथील जेवण दोन घास जास्तीचेच जाते. नागपूरच्या झणझणीत सावजी जेवणाची चवदेखील इथे चाखायला मिळते. शाकाहारी व मांसाहारी जेवणाची व्यवस्था असलेल्या ह्या उपहारगृहाचे चालक दोन भाऊ आहेत. मात्र हे उपहारगृह या ठिकाणी काम करणाऱ्या विठ्ठलच्याच नावाने अधिक ओळखले जाते. त्यामुळे विभागातील अधिवेशनात नागपूरला येणाऱ्या प्रत्येक अधिकाऱ्याच्या तोंडी हे नाव अगदी घट्ट बसले आहे. मी गेली अनेक वर्षे अधिवेशनात कित्येक दिवस नागपूरला राहिलो आहे. त्यामुळे गेली जवळपास पंधराएक वर्षे तरी या ठिकाणी विठ्ठलला पाहत आलो आहे. त्यामुळे केवळ अधिवेशन काळात भेटणाऱ्या ह्या व्यक्तीसोबत एक वेगळे ऋणानुबंध तयार झाले आहेत. ह्या उपहारगृहातील जेवणाने कधीही त्रास झाल्याचे मला आठवत नाही. सकाळी नाश्त्यात मिळणारे तर्रीपोहे, जेवणातील फणस, पातोडी यासारख्या भाज्या विशेष लक्षात राहतात. अत्यंत नम्र व हसतमुख स्वभाव, जितकी उपहारगृहाच्या व्यवसायाची काळजी तितकीच जेवायला येणाऱ्या प्रत्येकाची घेण्याचा स्थायी भाव, हवे तितकेच पण पोटभर जेवण्याचा आग्रह यामुळे ही व्यक्ती विशेष लक्षात राहते. यंदा अधिवेशन संपल्यानंतर निरोप घेताना कार्यालयीन सहकाऱ्यांबरोबर एरव्ही कॅमेऱ्यापासून दूर राहणाऱ्या विठ्ठलसोबत छानसा फोटो घेतला व अशा विशेषत्व असणाऱ्या व्यक्तीबद्दल लिहिणे न राहवल्याने हा लेखप्रपंच.
वैभव
Comments
Post a Comment