ऐतिहासिक मनःशांती देणारे नागपुरातील ठिकाण "दीक्षाभूमी"

हिवाळी अधिवेशन काळात नागपूर मुक्कामी असताना दिक्षाभूमीला मी आवर्जून भेट देतो. यंदाही कार्यालयीन सहकाऱ्यांसह दिक्षाभूमी न्याहाळत इथे पुस्तक खरेदीदेखील केली. नागपूर येथील आमच्या विश्रामगृहापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेला दीक्षाभूमी परिसर दिवसभर गजबजलेला परिसर असला तरी इथे भेट देणाऱ्या सर्वांना कमालीची मनःशांती देतो. या दिक्षाभूमीला मोठे ऐतिहासिक वलय लाभलेले आहे. यामुळे नागपूर व संपूर्ण महाराष्ट्रातील एक महत्वपूर्ण स्थान असलेल्या ह्या दीक्षाभूमीचे महत्वदेखील खूप मोठे आहे. रामदास पेठेजवळ व माताकचेरी परिसरासमोर उपराजधानी नागपूर मध्ये स्थित हे ठिकाण. याला धम्म चक्र स्तूप असेही म्हटले जाते. दरवर्षी लाखो भीम अनुयायी व पर्यटक या ठिकाणाला भेट देत असतात. अत्यंत शांत, अचल व मनशक्ती वाढवणारे हे ठिकाण आहे. बाजूला अगदी विस्तीर्ण मैदान, बोधिवृक्ष व आकर्षक प्रवेशद्वार यामुळे दिक्षाभूमीचे सौंदर्य अधिकच खुलून दिसते. दीक्षा भूमी हे बौद्ध धर्माचे अतिशय महत्वाचे ठिकाण आहे. १४ ऑक्टोबर १९५६ मध्ये डॉ. भीमराव रामजी (बाबासाहेब) आंबेडकरांनी लाखो दलित लोकांसह याच जागेवर बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती. एकाच दिवशी तेही शांततेच्या मार्गाने घडून आलेले जगाच्या इतिहासातील हे पहिलेच धर्मांतर होते. दरवर्षी या दिवशी लाखो लोक इथे जमा होतात आणि हा दिवस मोठ्या उत्साहानी साजरा करतात. दीक्षा भूमीचा विस्तार मोठा आहे, कलेचा एक उत्तम नमुना आपल्याला इथे पाहायला मिळतो. दीक्षा भूमीच्या बांधकामासाठी ५००० लोकांनी अहोरात्र परिश्रम घेतले आहे. याच्या बांधकामासाठी धौलपूर इथून आणलेल्या मार्बल आणि ग्रेनाइट चा वापर केलेला आहे. दीक्षा भूमीचा डोम हा १२० फूट उंचीचा आहे. दीक्षाभूमीचा आकार हा एका भव्य बौद्ध स्तुपाप्रमाणे आहे, म्हणून याला 'धम्मचक्र स्तूप' असेही म्हटले जाते. भारतातील व विदेशातील, मुख्यत्वे जपान, जर्मनी, म्यानमार, श्रीलंका येथील अनेक अनुयायी व प्रसिद्ध व्यक्ती या स्थळास भेट असतात. यात बौद्ध उपासक व भिखु अधिक असतात. सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्व तिसऱ्या कलिंग युद्धानंतर बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती. आणि म्हणून बौद्ध इतिहासात हा दिवस अशोक विजयादशमी म्हणून साजरा केला जातो. या स्थळाला राज्य सरकारने अ वर्ग पर्यटनस्थळाचा दर्जा दिलेला असून दरवर्षी येथे पंचवीस लाखापेक्षा अधिक देशी, विदेशी बौद्ध अनुयायी व पर्यटक भेट देत असतात. नागपूर शहराच्या केंद्रस्थानी असलेले हे स्थळ भारतरत्न डॉ आंबेडकर यांचे जीवनचरित्र समजून घेण्याचे आणि मनःशांतीचे उत्तम ठिकाण आहे.



वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंब

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त