पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील निराधार मुलांना कपडे व खाऊचे वाटप

*पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील निराधार मुलांना कपडे व खाऊचे वाटप*

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जॉय ऑफ गिव्हिंग ह्या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून शनिवार दिनांक २५ जानेवारी २०२५ रोजी पनवेलच्या वनवासी कल्याण आश्रमातील निराधार मुलांना कपडे व खाऊचे वाटप करण्यात आले. मुंबई येथील व्यवसायिक श्री अर्जुन सिंग झाला यांनी आश्रमातील मुलांना नवीन कपडे शिवून देण्यासाठी आर्थिक सहाय्य केले. जॉय संस्थेच्या माध्यमातून सदर कपडे मुलांना वाटप करण्यात आले. तसेच यावेळी मुलांना खाऊचे वाटपही करण्यात आले. यावेळी जॉयचे नवी मुंबई समन्वयक वैभव पाटील आणि आरोग्य सेवेतील वैद्यकीय अधिकारी डॉ सुभाष घोलप उपस्थित होते. पनवेल वनवासी आश्रमाचे केंद्रप्रमुख राजेंद्र शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करत आभारही व्यक्त केले. जॉय ऑफ गिव्हिंग ह्या संस्थेने नोव्हेंबरमध्ये दिवाळी भेट उपक्रम ह्या आश्रमातील मुलांसोबत साजरा करत त्यांना फराळ व जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते. त्यावेळी नव्या वर्षात ह्या निराधार मुलांना नवे कपडे उपलब्ध करून देण्याचा संकल्प जॉयमार्फत करण्यात आला होता. त्यानंतर मुंबईतील संवेदनशील व्यावसायिक अर्जुनसिंग यांनी मुलांना नवीन कपडे शिवून देण्याची तयारी दर्शवली. कोपरखैरणे येथील चॉईस टेलर यांनी माफक दरात सदर कपडे शिवून दिले. त्यानंतर शनिवारी वैभव पाटील व डॉ घोलप यांनी सदर कपडे मुलांपर्यंत पोहोचवले. नव्या वर्षात नवीन कपडे मिळाल्याने मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद लपून राहत नव्हता. त्यांनी आपल्या विशिष्ट शैलीत जॉय संस्थेचे आभार मानले. यावेळी डॉ घोलप यांनी आपल्या मनोगतातून मुलांना आगामी परीक्षांसाठी शुभेच्छा देत भविष्यात आपल्या शैक्षणिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला. वैभव पाटील यांनीदेखील भविष्यातील शिक्षण अनेक आव्हानांचा सामना करायला लावणारे असून आपले करिअर सुकर करण्यासाठी मुलांनी अभ्यासात झोकून द्यावे व स्वतःच्या पायावर उभे राहिल्यावर समाजातील गरीब, गरजूंच्या मदतीसाठी तत्पर राहावे असे आवाहन उपस्थित मुलांना केले. कार्यक्रमाच्या शेवटी केंद्रप्रमुख शिंदे यांनी आभारपत्र प्रदान करत जॉय संस्थेचे आभार मानले. 


वैभव पाटील

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त