आषाढी एकादशीनिमित्त वृक्ष पूजन आणि वृक्षारोपण
श्री गजानन महाराज भक्तमंडळ आणि युथ कौंसिलचा आषाढीनिमित्त वृक्षपूजन व वृक्षारोपण शुभारंभ सोहळा उत्साहात संपन्न
श्री गजानन महाराज भक्त मंडळ वाशी आणि युथ कौंसिल नेरुळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे आषाढी एकादशीच्या निमित्ताने रविवार दिनांक ६ जुलै २०२५ रोजी सकाळी १० वाजता वृक्ष पूजन आणि वृक्षारोपण शुभारंभ सोहळा नेरुळ येथील सावली रोपवाटिकेत मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मा नगरसेविका सौ मीरा पाटील, नवे शहरचे उपसंपादक राजेंद्र घरत, जे ना संघ ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रभाकर गुमास्ते, पंडित जितेंद्र कुलकर्णी गुरुजी, नवी मुंबई महानगरपालिका घणसोली शाळेचे मुख्याध्यापक अशोकराव सोनावणे आणि लेखक, सामाजिक कार्यकर्ते वैभव मोहन पाटील आदी मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. यावेळी पंडित जितेंद्र गुरुजींनी मंत्रोपचार आणि वृक्ष महत्व समजाऊन सांगत विधिवत वृक्ष पूजन केले. यानंतर युथ कौंसिलचे मुख्य सचिव सुभाष हांडे देशमुख यांनी संस्थेच्या कार्याचा मागोवा घेत आजवरची वाटचाल उपस्थितांसमोर मांडली. १ जून १९८८ रोजी स्थापन झालेल्या युथ कौंसिलमधील बहुतांश सभासद मोठमोठ्या हूद्द्यांवरून आज निवृत्त झाले असून जेष्ठ नागरिक म्हणून संस्थेच्या प्रत्येक उपक्रमात हिरीरीने योगदान देत आहेत. नवी मुंबई महानगरपालिका स्थापनेच्या पूर्वीपासून सिडको तसेच आरसीएफच्या सहयोगातून युथ कौंसिलने नवी मुंबईच्या अनेक भागांत वृक्षारोपण मोहिमा राबविल्या. पोलिस आयुक्त कार्यालय, नेरुळ पोलीस स्थानक, जुईनगर रेल्वे स्थानक परिसरात कौंसिलने लावलेली झाडे आज परिसराची शोभा वाढवण्याबरोबरच शुद्ध हवा आणि सावली देणारी ठिकाणे बनली आहेत. संस्थेच्या वतीने दरवर्षी रक्तदान, श्रमदान, वृक्षारोपण इत्यादिंसह अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत असल्याचे हांडे देशमुख सांगितले. यानंतर देशमुख यांनी व्यासपीठावरील पाहुण्यांसह उपस्थित सभासदांची ओळख करून दिली. पत्रकार राजेंद्र घरत यांनी आपल्या मनोगतात सुभाष हांडे देशमुख यांच्या स्वभावाचे कौतुक करत इतरांबद्दल चांगले बोलणारी, चांगल्या भावना ठेवणारी त्यांच्यासारखी माणसे दुर्मिळ असल्याचे मत व्यक्त केले. माणूस स्वर्गवासी झाल्यावर नव्हे तर जिवंत असेपर्यंतच त्याच्याबद्दल चांगले बोलण्याला अर्थ असतो असेही रोखठोक मत त्यांनी मांडले. त्याचबरोबर विविध संस्था तसेच शासनामार्फत दरवर्षी कोट्यवधी झाडांचा संकल्प करून ती लावण्यात येतात मात्र त्या झाडांचे पुढे काय होते याचा लेखाजोखा ठेवला जात नसल्याबद्दल घरत यांनी खंत व्यक्त केली. संस्थेचा सल्लागार असल्याचा अभिमान असून दरवर्षी संस्थेच्या सर्व उपक्रमांत विशेषतः दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी शांतीवन येथील कुष्ठरुग्णांसाठीच्या उपक्रमात सहभाग घेतो असेदेखील घरत यांनी स्पष्ट केले. पंडित कुलकर्णी गुरुजींनी आपल्या विवेचनात हिंदू धर्म आणि संस्कृतीचे रक्षण करण्यासाठी सर्वांनी सजग व कटिबद्ध राहण्याचा मौलिक सल्ला दिला. त्याचबरोबर गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये हनुमान चालिसाचे पठण नियमितपणे व्हायला पाहिजे असेही मत मांडले. गेल्या पाच सहा वर्षांपासून ह्या कार्यक्रमात ब्राह्मण म्हणून नाही तर एक सभासद म्हणून सहभाग घेत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मा नगरसेविका मीरा पाटील यांनीही संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी नुकतेच आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने रुग्णवाहिका लोकार्पित करणारे व महिलांच्या कौशल्य विकासासाठी विविध उपक्रम राबवणारे सामाजिक कार्यकर्ते हरीश इंगवले तसेच सोशल माध्यमकर्मी कौस्तुभ देशपांडे यांनीदेखील उपस्थिती दर्शवली. युथ कौंसिलच्या जेष्ठ सभासदांचा सामाजिक कार्यातील उत्साह पाहून स्फूर्ती व प्रेरणा मिळत असल्याचे सांगत आषाढी एकादशीच्या निमित्ताने वृक्षपूजनासारखा सर्वांगसुंदर स्तुत्य उपक्रम पंढरीचे दर्शन घडवणारा असल्याचे मत लेखक वैभव पाटील यांनी मांडले. शेवटी संस्थेचे सभासद शिवाजीराव शिंदे यांनी उपस्थितांचे आभार मानले. कार्यक्रमाचा समारोप फराळ, चहा तसेच तुळशीचे रोपटे देऊन करण्यात आला.
Comments
Post a Comment