श्रीगोवर्धन इको व्हिलेज, गालतरे, पालघर

अध्यात्म आणि निसर्गसौंदर्याचा अद्भुत मिलाप 
यंदा गणेशोत्सवादरम्यान एका अद्भुत ठिकाणाला भेट देण्याचा योग आला. गेले काही महिने या ठिकाणी जाण्याच्या विचारात होतो. पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील गालतरे गावात अप्रतिम असे 'गोवर्धन इको व्हिलेज' साकारण्यात आलेले आहे. श्री कृष्ण महात्म्याची अध्यात्मिक पार्श्वभूमी असलेले हे स्थळ निसर्ग व कलाकुसरीचा अप्रतिम नमुना आहे. दिड दिवसांच्या श्रीगणेश विसर्जनानंतर मी सहकुटुंब आपला मोर्चा ह्या ठिकाणाकडे वळवला. वाडा येथून मनोर महामार्गावर कंचाड फाट्यावरून डावीकडे गोऱ्हे रोडवर वळले की जवळपास १० ते १२ किलोमीटर अंतरावर गालतरे येथे हे निसर्गरम्य वातावरणात इको व्हिलेज वसलेले आहे. मुंबई ठाण्यापासून केवळ ८०-१०० किमी अंतरावर आहे. आम्ही साधारण साडेचारच्या सुमारास तिथे पोहोचलो. हा रस्ता सध्या काहीसा वळणाचा व खड्डेमय असला तरी आजुबाजूच्या निसर्ग सौंदर्यामुळे प्रवासात कमालीचा आनंद देतो. गेटमधून आत प्रवेश केल्यानंतर वाहनांसाठी मुबलक पार्किंग दोन्ही बाजूला उपलब्ध आहे. समोर माहिती केंद्र व बुकिंग कार्यालय आहे. एका दिवसाच्या भ्रमंतीसाठी इथे कुठलेही शुल्क नाही. तेथील निसर्ग सौंदर्य व रमणीय वातावरण पाहून आम्ही तिथे मुक्काम करण्याचा निर्णय घेतला व महावन ह्या निवासस्थानातील रूम आम्हाला देण्यात आली. रिमझिम पावसामुळे तेथील वातावरणात कमालीचा गारवा आणि निसर्ग सौंदर्य जाणवत होते. आपल्याला हव्या तश्या निवासस्थानाची व्यवस्था येथे सशुल्क उपलब्ध आहे. त्यानंतर मुख्य मंदिर व श्री श्री राधा मदनमोहन मंदिरात आम्ही दर्शन घेतले. श्री श्री राधा मदनमोहन मंदिर हे वृंदावनमध्ये स्थापन झालेल्या आणि आता गोवर्धन इको-व्हिलेजमध्ये पुनर्स्थापित केलेल्या सात महत्त्वाच्या गौडीया वैष्णव मंदिरांपैकी एक आहे. तेथील अनेक मंदिरे, उद्यान व कृष्णलिलेच्या अनेक गोष्टी पाहायला मिळाल्या. 
मुख्य मंदिर सकाळी ४.३० वाजता उघडते आणि सायंकाळी ७.३० वाजता बंद होते. तिथे सायंकाळी सहा वाजता आम्हाला मंदिरात अत्यंत श्रवणीय वाद्यमय आरती व भजने ऐकायला मिळाली. सांज आरतीनंतर ७.३० वाजता नैवेद्य दाखवून मंदिर दर्शन बंद झाले. त्यानंतर तेथील श्रीनाथ ह्या उपहारगृहात आम्ही अल्पोपहार घेतला. हा परिसर आकाराने खूप मोठा असल्याकारणाने तिथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यास मिनिटामिनिटाला इलेक्ट्रीक इको वाहने आहेत. याच वाहनाने आम्ही साधारण ७०० मीटर आतमध्ये जात 'महावन' ह्या निवासालयातील रूममध्ये जात फ्रेश झालो. रात्री नऊच्या सुमारास निवासस्थानाच्या जवळील 'गोविंदा' ह्या उपहारगृहात अत्यंत सात्विक असलेले भोजन केले व परिसरात शतपावली करत रूमवर येत झोपी गेलो. सकाळी लवकर मुख्य मंदिरात मंगल आरती, गुरू पूजा, शृंगार दर्शन यांसह योग शिबिराचा लाभदेखील घेता येतो. त्यानंतर प्रेम सरोवर येथे विविध कृष्णलीला न्याहाळत आम्ही वॉक करत गोवर्धन परिक्रमा केली. 
त्यानंतर नऊच्या सुमारास गोविंदा उपहारगृहात न्याहारी केली. येथील दोन्ही उपहारगृहे भव्य असून तेथे सर्व प्रकारचे मेन्यू उपलब्ध करणारी असून उत्तम दर्जाचे अन्न तिथे मिळते. खाण्यातल्या अनेक आवडीच्या डिशेस इथे तुम्हाला मिळतील ज्यात अगदी वडापाव, डोसा, पराठे, इडली, मेंदू वडा, पावभाजी, पुरी भाजी, पाणीपुरी, शेवपुरी, थाळी, जूस, आईस्क्रीम यासारखे अनेक पदार्थ उपलब्ध आहेत. त्यानंतर आयुर्वेदा, गिफ्ट शॉप, किड्स झोन तसेच गौशाळेस आम्ही भेट दिली व तिथे काही वस्तूही खरेदी केल्या. आयुर्वेद उपचार केंद्राजवळ एक भव्य जलतरण तलावदेखील उभारण्यात आलेला असून त्याचा स्त्री, पुरुष व कुटुंबासह दिलेल्या ठराविक वेळेनुसार वापर करता येतो. आम्हीही दुपारी तासभर या जलतरण तलावात पोहण्याचा आनंद घेतला. हा संपुर्ण परिसर अत्यंत रमणीय असून तलावाभोवती फिरताना बदकांचा मुक्त विहार, पक्षांचा किलबिलाट व पाण्याचा खळखळाट पाहून मन तृप्त होते. मुलींनी ह्या सर्व वातावरणाचा व परिसराचा मनमुरादपणे आनंद लुटला. 
नैसर्गिक संसाधनांचा व कृष्णलिलेच्या प्रतिकृतींचा वापर करून ह्या सर्व परिसराचे रूपांतर मिनी वृंदावनमध्ये करण्यात आले आहे. या उद्यानात शेकडो पक्षी आणि फुलपाखरे असलेले जलकुंभ आणि वनस्पती आहेत. इथे १३०+ प्रजातींची ८००० झाडे आणि वनस्पती आहेत असे समजते. इथे भेट देण्यासाठी दुरदुरवरून भाविक व पर्यटक येत असून येथील ब्रम्हचारी त्यांना सर्व ठिकाणांची इत्यंभूत माहिती देत असतात. त्या दिवशी मुंबईहून एक मोठा विद्यार्थ्यांचा गट तिथे कार्यशाळेसाठी आलेला होता व त्यांनादेखील संपूर्ण परिसरात फिरवून ठिकठिकाणी माहिती देण्यात येत होती. या ठिकाणी पुरुष भाविकांना प्रभुजी तर महिलांना माताजी म्हणून संबोधण्यात येते. यमुना हिमालयातील यमुनोत्री येथे उगम पावते आणि मथुरा आणि वृंदावन या शहरांमधून वाहते, जिथे तिची पूजा आणि श्रद्धा खूप जास्त असते. त्याचप्रमाणे गोवर्धन इको व्हिलेजमध्ये यमुना नदीच्या काठाची प्रतिकृती बनवली आहे. दररोज संध्याकाळी ६.१५ वाजता या नदीच्या काठावर यमुना आरती होत असते जे इको व्हिलेजमधील एक प्रमुख आकर्षण आहे.
तसेच इथे रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौर ऊर्जा संयंत्र आणि कचरा व्यवस्थापन संयंत्रांबद्दल बरेच काही माहिती मिळत असून इको व्हिलेज मध्ये हे सर्व प्रकल्प यशस्वीरित्या राबवण्यात आलेले आहेत. यामुळेच हा परिसर सर्वच बाबतीत स्वयंपूर्ण आहे. सध्या पावसाळ्यात सर्वत्र हिरवळ पसरलेली असून येथील वातावरण अत्यंत शांत, आल्हाददायक व थंडगार आहे. इथे कमालीची स्वच्छता असून बागा सुंदर, व्यवस्थित राखलेल्या आणि हिरव्यागार आहेत. पावसाचे पाणी साठवण्याची व्यवस्था कमालीची आहे जी इथे वर्षभर पाणी पुरवते, केवळ तिथे राहणाऱ्या कुटुंबांनाच नाही तर वनस्पती, बागा आणि पिके वाढवण्यासाठी आणि वर्षभर इको-व्हिलेजला भेट देणाऱ्या मोठ्या संख्येने पर्यटकांना देखील पाणी पुरवते. गोवर्धन इको व्हिलेजमध्ये, पर्यावरणपूरक इमारती निर्माण करण्यासाठी पावले उचलण्यात आली आहेत. इथे इमारती मातीपासून बनवलेल्या विटांपासून बांधल्या गेलेल्या आहेत. या विटा जैवविघटनशील असतात. त्यांचे आयुष्य सुमारे ८०-९० वर्षे असते जे विटाच्या सामान्य आयुष्यापेक्षा कितीतरी जास्त असते. या विटा प्रामुख्याने दुमजली बांधकामात वापरल्या जातात जिथे कोणत्याही खांबांची आवश्यकता नसते. या विटांना प्लास्टरिंग किंवा पेंटिंगची देखील आवश्यकता नसते कारण त्यांचे स्वतःचे सौंदर्य असते आणि त्यांची खूप कमी झीज होते. गोवर्धन इको व्हिलेज हे निश्चितच वैष्णव आणि इस्कॉन भक्तांसाठी एक धार्मिक स्थळ आहे. पण त्याशिवाय आम्हाला या ठिकाणी संपूर्ण इको-सिस्टम कशी विकसित केली आहे आणि या ठिकाणाचे इको-व्हिलेजमध्ये कसे रूपांतर झाले आहे हेही अनुभवता आले. इस्कॉनने संपूर्ण ठिकाणाला पर्यावरणपूरक बनवले आहे. संपूर्ण गाव सर्व प्रकारे स्वयंपूर्ण आहे. ते स्वतःची वीज, वनस्पतींसाठी खत आणि खत, गांडूळ खत, स्वतःचे सेंद्रिय अन्न (भाज्या, धान्य आणि डाळींसह), मंदिरांमध्ये वापरले जाणारे फुले, तूप आणि लोणी सारखे दुग्धजन्य पदार्थ (गोशाळेतील), घन आणि प्लास्टिक कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी वनस्पती तयार करतात. तसेच त्यांना इंधन आणि खत बनवतात तसेच इको-व्हिलेजमध्ये कॉटेज आणि इतर निवासी घरे बनवण्यासाठी स्वतःचे बांधकाम साहित्य देखील तयार करतात. 
येथील निसर्गरम्य पर्वतांनी वेढलेले वातावरण, सुंदर वृंदावन जंगल, सुव्यवस्थित कृष्णलीलांच्या मूर्तींनी सजलेली बाग, गावामागील निसर्गरम्य पर्वतरांगा आणि उपहारगृहात दिल्या जाणाऱ्या सात्विक अन्नाचा आस्वाद घ्यायचा असेल तर आपणही एकदा ह्या ठिकाणास अवश्य भेट द्या. मुंबई ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारे हे गोवर्धन इको व्हिलेज अध्यात्म आणि नैसर्गिक वातावरणाचा अद्भुत मिलाप असून आपण एकदा तरी या ठिकाणास भेट देऊन येथील पर्यावरणपूरक इको वातावरणाचा लाभ घ्यावा यासाठीच हा लेखप्रपंच. 

गोवर्धन इको-व्हिलेजचा पत्ता – गालतरे, पो. हमरापूर, वाडा तालुका जिल्हा पालघर – ४२१ ३०३ महाराष्ट्र, भारत. 


वैभव मोहन पाटील 
घणसोली, नवी मुंबई 
(मूळ गाव - देवघर, ता. वाडा, जि. पालघर)

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त