रामकृष्ण मठ, धंतोली, नागपूर
शांत, स्वच्छ, अध्यात्मिक ठिकाण
नागपूर येथील एका शांत, अध्यात्मिक वातावरणातील ठिकाणास भेट देण्याचा नुकताच योग आला. मागील महिन्यात नागपूरच्या एका सहकारी मित्राने "शोध आनंदाचा" हे वाचनीय पुस्तक वाढदिवसानिमित्ताने भेट दिले होते. ते पुस्तक वाचता वाचता प्रकाशन संस्थेचे 'रामकृष्ण मठ', नागपूर हे नाव वाचनात आले होते. त्याच वेळेस अधिवेशन काळात ह्या ठिकाणी भेट देण्याचा संकल्प केला होता. त्यानुसार सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास कार्यालयीन सहकाऱ्यांसह आमच्या वसतीगृहापासून जवळच असलेल्या या ठिकाणी भेट दिली. नागपूर येथील रामकृष्ण मठ हा धंतोली ह्या काहीश्या गजबजलेल्या परिसरात असून, तो स्वामी विवेकानंदांनी स्थापन केलेल्या रामकृष्ण मिशनचा एक भाग आहे. अत्यंत सुरेख, रेखीव बांधकाम, कमालीची स्वच्छता व शांतता तसेच नियोजनपूर्ण व्यवस्थापन यामुळे हे ठिकाण मनाला खूप भावले. या मठात अध्यात्मिक शांतता, ध्यानधारणा आणि धार्मिक साहित्याची विपुल उपलब्धता आहे. तसेच तरुणांसाठी विशेष वर्ग आणि विविध सेवा कार्ये चालतात, ज्यामुळे तो एक शांत व सकारात्मक ऊर्जा देणारा मठ म्हणून ओळखला जातो. आरोग्य सेवा, आपत्ती निवारण, शिक्षण आणि ग्रामीण विकास यांसारख्या क्षेत्रांत रामकृष्ण मिशन कार्य करत आहे. या केंद्राची स्थापना १९२८ मध्ये झाली. नियतकालिकांसह सार्वजनिक ग्रंथालय,विद्यार्थ्यांचे घर, दवाखाना, फिरते वैद्यकीय युनिट, नेत्र तपासणी शिबिरे , शैक्षणिक किट, अन्न , कपडे , स्वच्छता किट आणि आर्थिक मदत प्रदान करणे यासारखे उपक्रम संस्थेमार्फत चालविले जातात. नियमित पूजा, अध्यात्मिक प्रवचन यासारखे धार्मिक उपक्रम नित्यनेमाने राबविले जात असल्याचीही माहिती मिळाली. येथे ध्यानधारणा, प्रार्थना आणि आध्यात्मिक शांतीसाठी उत्तम वातावरण आहे हे आम्ही त्या ठिकाणी जवळपास अर्धा तासाच्या धारणेत अनुभवले. वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी या ठिकाणी स्वतंत्र प्रकाशन विभाग कार्यरत असून स्वामी विवेकानंद यांचेसह विविध धार्मिक पुस्तके, विशेषतः भगवद्गीतेशी संबंधित साहित्य सर्व मराठी, हिंदी, इंग्रजी यांसह इतरही भाषांमध्ये मुबलक उपलब्ध आहे. स्वामी विवेकानंदांचे विचारांचे प्रचंड साहित्य आबालवृद्धांसाठी या ठिकाणी उपलब्ध असून वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी अत्यंत माफक दरात ही पुस्तके उपलब्ध करून देण्यात येत आहेत हे प्रकाशन संस्थेचे वैशिष्ट्य. आम्हीदेखील पुस्तकांची मनसोक्त खरेदी करत आनंद, शांती आणि समाधान देणाऱ्या ह्या ठिकाणाचा दीड तासाच्या सानिध्यानंतर निरोप घेतला.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment