बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय
नागपूरमध्ये जाऊन आपल्याला वन्य प्राण्यांना पाहण्याची इच्छा असेल तर बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणीसंग्रहालय हा एक उत्तम पर्याय उपलब्ध आहे. नागपूर शहरापासून फक्त ८ किमी अंतरावर असणाऱ्या ह्या अद्भुत ठिकाणास भेट देण्याचा नुकताच योग आला. जवळपास पाचशेपेक्षा जास्त हेक्टर जागेवर पसरलेले हे प्राणिसंग्रहालय बहुदा देशातील सर्वात मोठे प्राणिसंग्रहालय आहे. ह्या प्राणीसंग्रहालय उद्यानात सध्या भारतीय सफारी करता येते आणि भविष्यात आफ्रिकन सफारी आणि रात्रीच्या सफारीचा आनंददेखील घेता येणार आहे. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान हे एक प्राणीसंग्रहालय आणि सफारी स्थळ आहे. येथे वाघ, बिबट्या, स्लॉथ बेअर, हरीण आणि नीलगाय असे अनेक प्राणी आहेत ज्यांना एका मोठ्या खुल्या पिंजऱ्यासारख्या जागेत ठेवण्यात आले आहे. येथे सर्व प्राणी उघड्या जागेत फिरतात असे वाटते की ते जंगलात आहेत. फक्त येथे तुम्ही हे सर्व प्राणी पाहण्यासाठी बंद बसमध्ये सफारी करता. तुम्ही बंद वातानुकूलित बसने गोरेवाडा प्राणीसंग्रहालय उद्यानातील सर्व प्राण्यांचे दर्शन घेऊ शकता. वाघ सफारी, बिबट्या सफारी, स्लॉथ बेअर सफारी आणि शाकाहारी सफारी पाहू शकता. आम्ही या परिसरात प्रवेश करताक्षणीच दोन बिबट्यांचे अगदी जवळून दर्शन झाले. बसच्या पुढे जवळपास दहा पंधरा मिनिटे ते रमत गमत चालताना दिसले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने अनेक प्राणी अगदी जवळून न्याहाळता आले. शालेय मुलांच्या सहली या ठिकाणी मोठ्या संख्येने येताना दिसत होत्या. येथील विविध प्राणी व मुक्त वातावरणाचा मुले मनसोक्त, मनमुरादपणे आनंद घेत होती. जवळपास तासाभराच्या सफारी नंतर जंगल सफारी केल्याचा आनंद आम्हा सर्वांच्या चेहऱ्यावर होता. प्रशस्त अशा बंदिस्त पण मुक्त वातावरणात प्राण्यांना स्वच्छंदी आणि पर्यटकांना जंगल सफारीचा आनंद देणारा हा झु पार्क निसर्ग व प्राणी प्रेमींसाठी एक पर्वणीच आहे.
वैभव मोहन पाटील
घणसोली, नवी मुंबई
Comments
Post a Comment