बहुआयामी व्यक्तिमत्व आरोग्य सेवक डॉ. प्रभाकर भेरे
*बहुआयामी व्यक्तिमत्व आरोग्य सेवक डॉ. प्रभाकर भेरे*
ठाणे जिल्ह्यातील एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणजे आरोग्य सेवक पदावर कार्यरत डॉ. प्रभाकर दामोदर भेरे. सध्या वज्रेश्वरी प्राथमिक आरोग्य केंद्रात कार्यरत असलेल्या भेरे यांनी आपल्या आरोग्य सेवेतील कारकिर्दीला खऱ्या अर्थाने न्याय देत कार्यकक्षेपलीकडे जाऊन अनेक नवनवीन संकल्पना विभागासाठी राबविल्या ज्याचा मोठा लाभ रुग्ण व ग्रामस्थांना झाला. स्वतः आजवर ४६ वेळा रक्तदान करून "गाव तेथे रक्तदाता" ही संकल्पना राबवून रक्तदानाची चळवळ व प्रचार व्यापक प्रमाणात केला. आरोग्य शिक्षणावर शीघ्र कविता तसेच वारली चित्राव्दारे आरोग्य शिक्षण देणारे भेरे हे एकमेवाद्वितीय आरोग्य कर्मचारी आहेत. आरोग्याबाबत जनजागृती करण्यासाठी त्यांनी अनेक छोट्यामोठ्या व्हिडीओ क्लिप्स तयार करून प्रसारित केल्या. स्वतः पुरुष नसबंदी करून पत्नीचा सम्मान करून कुटुंब नियोजनाचा एक अनोखा आदर्श त्यांनी समाजात निर्माण केला आहे. व्यसनमुक्तीकरीता शाळा, कॉलेजमध्ये जाऊन ते जनजागृती करतात. आरोग्य, पर्यावरण, शेतकरी, व्यसनमुक्ती, वृक्षलागवड, शिक्षणाचे महत्व इ. विषयावर त्यांनी कविता लेखन करत समाजप्रबोधन केले आहे. जिवंतपणी रक्तदान आणि मरणोत्तर अवयवदान पुरस्ककर्ते म्हणून ते ओळखले जातात. महाराष्ट्र रक्तकर्ण पुरस्कार, आदर्श आरोग्य सेवक पुरस्कार, कोरोना योध्दा पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले आहे. आरोग्य व सामाजिक कार्याकरीता विश्व मानवअधिकार आयोगाकडून डॉक्टरेट इन सोशल वर्क ही मानद पदवी त्यांना प्राप्त झाली आहे. त्यांच्या जन्मदिनी म्हणजे १ जानेवारी रोजी आपल्या कारकिर्दीला व पेशाला वेगळे महत्व प्राप्त करून देण्याच्या उद्देशाने गेल्या काही वर्षांपासून ते ह्या दिवशी 'आरोग्य सेवक दिन' साजरा करण्याचा अनोखा उपक्रम राबवत आहेत. नुकतेच विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एका उपक्रमासाठी आयोजित चर्चासत्रात उपस्थित राहण्यासाठी मुंबईला आले असता त्यांची भेट झाली. आरोग्य सेवेला आणि लोकहितासाठी समर्पित असलेल्या डॉ प्रभाकर भेरे यांच्यासारखे कर्मचारी आरोग्य विभागासाठी नक्कीच भूषणावह असून तो एक प्रकारचा 'ठेवा'च म्हणावा लागेल. त्यांच्या कार्याला सलाम आणि शुभेच्छा.
वैभव मोहन पाटील
Comments
Post a Comment