श्री गणेश हिरवे

सामाजिक कार्यातील महामेरु
आमचे परममित्र व सामाजिक कार्यातील आदर्श श्री गणेश हिरवे यांचा आज ५३वा वाढदिवस. गेल्या दशकभरापासून आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. त्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या जॉय ऑफ गिव्हिंग ह्या संस्थेच्या माध्यमातून नवी मुंबई, ठाणे, पालघर मध्ये अनेक सामाजिक उपक्रम त्यांच्या सोबतीने राबवता आले. त्यांच्या आजारपणात, अनुपस्थितीत व  मार्गदर्शनाखाली काही उपक्रम संस्थेमार्फत राबवण्याचा प्रसंग आला. पण कुठल्याही कार्यक्रमात हिरवे सर सोबत असताना एक बिनधास्तपणा असतो तो त्यांच्या गैरहजेरीत जाणवत नाही, एक प्रकारचे दडपण असते. गेल्या वर्षी जॉयचा दिवाळी अंक प्रकाशित करून आम्ही साहित्य क्षेत्रात पदार्पण केले तर हिरवे सरांनी आता जॉय एक्सप्रेस हे वृत्तपत्रदेखील सुरू केले आहे. खरेतर आपल्यासारख्या कुटुंबवत्सल लोकांना कुटुंब, नोकरी वा व्यवसायिक जबाबदाऱ्यातुन वेळ काढणे म्हणजे एक दिव्यच. त्यातून वेळ मिळालाच तर आपण एखादा आवडीचा छंद जोपासतो. माझेच उदाहरण घेतले तर कौटुंबिक व्याप व नोकरीतील व्यस्तता यातून दररोजच्या लिखाणासाठीदेखील वेळ काढणे जिकरीचे ठरते. त्यातुनच मग लोकलप्रवासात लिखाण करण्याचा मध्यम मार्ग मी निवडला व याच लोकल प्रवासामुळे लिखाणाचा छंद आज बऱ्यापैकी जोपासून आहे. असो, तर दैनंदिन व्यापातून वेळ काढून सामाजिक बांधिलकी जोपासणे व समाजकार्यात स्वतःला झोकून देणे हा विचार सर्वसामान्य व्यक्ती करूच शकत नाही. त्यातून समाजसेवा म्हटली की पदरमोड आली जी प्रापंचिक जबाबदाऱ्या पार पाडताना सर्वांना जमेलच असे नाही. मात्र गणेश हिरवे सरांचे आजवरचे कार्य व त्यांची त्यातील तत्परता आपण जर पहिली तर हा माणूस इतक्या साऱ्या गोष्टी इतक्या सहजपणे कशा करू शकतो याचे मला खरेतर अप्रूप वाटते. पत्रलेखनाच्या माध्यमातून आपले सामाजिक जीवन सुरू करणाऱ्या हिरवे सरांचा मूळ पेशा शिक्षकी आहे. आज ते एका वृत्तपत्राचे मुख्य संपादकदेखील आहेत ज्याद्वारे सामाजिक प्रश्न सोडवताना नवोदित लेखकांनादेखील स्फूर्ती देण्याचे काम करत आहेत. ज्ञानदानातील अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार देखील प्राप्त झाला आहे. सामाजिक कार्य व पत्रलेखनासाठी त्यांना आजवर शेकडो पुरस्कार प्राप्त झाले आहेत. रक्तदानाने महत्व व सामाजिक गरज ओळखून त्यांनी आतापर्यंत स्वतः ५० वेळा रक्तदान केलेले आहे. जोगेश्वरी येथे वास्तव्य करणारे हिरवे सर परिसरातील प्रत्येक सामाजिक, धार्मिक, राजकीय व क्रीडाविषयक उपक्रमांमध्ये हिरीरीने सहभाग घेतात त्यामुळेच त्यांचा जनसंपर्कदेखील खूप दांडगा आहे. माणसे जोडण्याचा त्यांना भला छंद आहे. निस्वार्थी भावनेने समाजकार्य करणारी अनेक माणसे त्यांनी आपल्या जॉय ऑफ गिव्हिंग या सोशल माध्यमातील ग्रुपद्वारे जोडलीत ज्यांच्या माध्यमातून त्यांनी अनाथ, वृद्ध, गरीब लोकांसाठी अनेक उपक्रम साजरे केले आहेत. सामाजिक बंधीलकीतून आपण समाजाचे देणे लागतो या भावनेतून लोकवर्गणीतून व प्रसंगी स्वतःची पदरमोड करून त्यांनी गरजूंना मदत केली आहे. आणि म्हणूनच मी त्यांच्या या उपक्रमांचा भाग आहे याचा मला खूप अभिमानच वाटतो. जोगेश्वरी येथील श्री समर्थ विद्यालय स्कूल कमीटीचे ते सभासद आहेत. राजहंस प्रतिष्ठान, गोरेगावचे सभासद असून त्या माध्यमातून अवयवदान व देहदान चळवळीसाठी त्यांनी सक्रिय योगदान दिलेले आहे. माजी पोलीस आयुक्त श्री वसंत ढोबले साहेब यांच्या मिसिंग पर्सन ब्यूरो या हरवलेलया व्यक्ति शोधून काढणाऱ्या NGO चेदेखील ते सक्रिय कार्यकर्ते आहेत. जॉय ऑफ गिविंग या सामाजिक संस्थेचे संस्थापक, जॉय एक्सप्रेसचे संपादक, मुंबईतील विविध सामाजिक संस्था व उत्सव मंडळांवर सल्लागार, दै मुंबई मित्र चे प्रतिनिधी, संत निरंकारी आध्यात्मिक मिशन चे सक्रिय कार्यकर्ते, एपीजे अब्दुल कलाम मोफत वृत्तपत वाचनालयाचे संस्थापक व संत नामदेव परीवाराचे कार्यकर्ते असा त्यांचा सामाजिक क्षेत्रातील प्रवास व लेखाजोखा आहे.  इतका सारा व्याप सांभाळून ते आपल्या मित्रमंडळीबरोबर कायम संपर्कात राहतात व विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करतात, त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करतात. हिरवे सरांबरोबर माझा नियमित संपर्क असून संस्थेच्या प्रत्येक उपक्रमाविषयी ते विस्तृतपणे चर्चा करतात, त्याचे बारकाईने नियोजन करतात, एखादा ज्वलंत विषय घेऊनही ते बऱ्याचदा फोन करतात व आपली भूमिका वृत्तपत्रांच्या माध्यमातून मांडण्यासाठी बजावतात. अत्यंत प्रामाणिक हेतूने समाजासाठी झोकून देऊन काम करणारी गणेश हिरवे सरांसारखी माणसे खरेतर या मतलबी जगात दुर्मिळच असून त्यामुळेच आम्हाला त्यांचा हेवा वाटतो. सामाजिक सेवेतील व्यापातून पुरेसा वेळ काढून त्यांनी आपले कौटुंबिक स्वास्थ्यदेखील उत्तम जपले आहे. पत्नी व दोन मुले असा त्यांचा परिवार असून त्यांच्याशी बोलताना नेहमीच त्यांची परिवराप्रति असलेली एक अतूट जोड व निसंदिग्ध प्रेमभावना प्रकट होते. माझ्यातील वृत्तपत्रलेखक जागता ठेवण्यामध्ये हिरवे सरांचा खूप मोठा वाटा असून त्याबद्दल माझ्या मनात त्याचेंबद्दल नितांत आदर आहे. संस्थेला विविध उपक्रमात सातत्याने मदत करणारी मंडळी व संस्थेच्या सभासदांबद्दल त्यांच्या मनात प्रचंड तळमळ आहे. सर्व सभासदांना एकत्र आणून त्यांच्या सामाजिक सेवेची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यासाठी जॉयच्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून गेल्या दोन वर्षांपासून ते जॉयचे स्नेहसंमेलन आयोजित करत आहेत. सामाजिक कार्यातील हिरवे सरांची आवड अधिकाधिक काळ टिकून राहो व हजारो गरजूंना त्याचा लाभ मिळो तसेच या कार्यासाठी त्यांना उदंड व निरोगी आयुष्य लाभो हीच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शुभेच्छा. 

वैभव

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त