Skip to main content

३१ मे - जागतिक तंबाखू विरोधी दिन

जागतिक तंबाखू विरोधी दिन
३१ मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिन साजरा होत आहे. व्यसन कुठलेही असो, ते घातकच. मात्र तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे वाढते सेवन आज चिंतनाचा विषय आहे. आपल्या सभोवताली वावरणाऱ्या अनेक लोकांना तंबाखू, सिगरेट, मावा यासारख्या आरोग्याला अपायकारक गोष्टींचे व्यसन असल्याचे आपणास दिसून येते. या वर्षी, २०२६ मध्ये, जागतिक तंबाखू विरोधी दिनाची संकल्पना "आकर्षणाचा बुरखा फाडणे – निकोटीन आणि तंबाखूच्या व्यसनाचा सामना करणे " ही आहे. तंबाखू आणि निकोटीन उद्योग लहान मुले आणि किशोरवयीन मुलांना आकर्षित करण्यासाठी उत्पादनांची विविध मार्ग अवलंबतात. त्याचा बुरखा फाडून अल्पवयीन मुलांना ह्या व्यसनापासून परावृत्त करणे हे या संकल्पनेचे उद्दिष्ट आहे. धुम्रपान हा अत्‍यंत गंभीर विषय असून महाविदयालयीन तरुणांमध्‍ये त्‍याचे वाढते प्रमाण चिंतेची बाब आहे. धुम्रपान हे मुख्‍यत्‍वे तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांशी निगडीत आहे. या पदार्थांचे सेवन करणारे लोक आपल्‍याला जागोजागी दिसून येतात. घर, कार्यालये तसेच सार्वजनिक ठिकाणी तंबाखू खाणारी व तंबाखूजन्‍य पदार्थांचे धुम्रपान करणा-या लोकांची संख्‍या दिवसेंदिवस वाढत आहे. या पदार्थांच्‍या विक्री व सेवनावर अनेक निर्बंध आणुनदेखील अनेक ठिकाणी त्‍यांची विक्री खुलेआम होताना दिसते. तंबाखू सेवनाने भारतात साधारणतः १० लक्ष लोक विविध आजारांनी मृत्‍यू पावत आहेत. महाराष्‍ट्रामध्‍ये साधारणतः ३६ टक्‍के पुरुष व ५ टक्‍के महिला तंबाखू व तंबाखुजन्‍य पदार्थांचा वापर करत असल्‍याचे सर्व्‍हेक्षणातुन स्‍पष्‍ट झाले आहे. तंबाखूमुळे ह़दयरोग, कर्करोग, यकृताचा आजार, फुफुसाचे आजार, टि.बी. यासारखे प्राणघातक आजार उदभवून बळी जाणा-यांची संख्‍या वाढत आहे. पक्षाघात, मोतीबिंदू, नपुसंकत्‍व, कमी वजनाचे – व्‍यंग असलेले – मृत्‍यु पावलेले बाळ जन्‍माला येणे यासारख्‍या व्‍याधी जडतात. यामुळे लोकांमध्‍ये अकाली मत्‍युंचे प्रमाण वाढलेले आहे. देशात बीडी, गुटखा, तंबाखू, सिगारेट, मावा, खैनी, मिसरी, चिलम यासारख्‍या तंबाखुच्‍या पदार्थांचे व्‍यसन सर्वाधिक केले जाते. शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्‍यांमध्‍ये तंबाखुसेवनाच्‍या प्रमाणाचा चढता आलेख अत्‍यंत गंभीर असुन धुम्रपानाचे वाढते प्रमाण खुपच चिंताजनक आहे. हे प्रमाण कमी करण्‍यासाठी तंबाखू सेवनाच्‍या दुष्‍परिणामाची माहिती शालेय व महाविदयालयीन विदयार्थ्‍या्ंपर्यंत प्रभावीपणे पोहाचणे अत्‍यंत आवश्‍यक आहे. अन्‍यथा हा भस्‍मासुर विदयार्थी दशेतच अनेक मुलांमध्‍ये पसरत जाऊन त्‍यांच्‍या शैक्षणिक आयुष्‍याबरोबरच आरोग्‍यदायी जिवनदेखील उध्‍वस्‍त होईल. केंद्र शासनाने यापुर्वीच शालेय विदयार्थ्‍यांसाठी तंबाखु नियंत्रण कायदा बहुतांशी राज्‍यांमध्‍ये सुरु केलेला आहे. यामध्‍ये शिक्षण संस्‍थांचा सहभाग हा अत्‍यंत महत्‍वपूर्ण आहे जेणेकरुन आरोग्‍य शिक्षणाच्‍या माध्‍यमातुन दुष्‍परिणामांबाबत जनजागृती करता येईल. शाळेपासुन महाविदयालयांपर्यांत अल्‍पवयीन मुलांचा संबंध येत असल्‍याने शाळा – महाविदयालये तंबाखु सेवन व इतर धुम्रपानाच्‍या नियंत्रणामध्‍ये मोलाची भुमिका बजावू शकतात. लहान वयापासुन मुले हया व्‍यसनांकडे आकर्षित होत असल्‍याने शाळा - महाविदयालयांच्‍या माध्‍यमातुन त्‍यांना व्‍यसनांपासुन परावृत्‍त केले गेले पाहिजे. यासाठी 'तंबाखूमुक्‍त विदयालय' ही संकल्‍पना प्रत्‍यक्षात उतरवणे गरजेचे आहे. शाळा - महाविदयालयांच्‍या अभ्‍यासक्रमात तसेच परिसरात विविध माध्‍यमांव्‍दारे तंबाखू सेवनाच्‍या दुष्‍परिणामांची व्‍यापक जनजागृती केल्‍यास ही बाब तंबाखू नियंत्रणामध्‍ये मोलाची भूमिका बजावू शकते. यामध्‍ये धुम्रपानापासुन होणारे अपाय दर्शवणारे बॅनर, होर्डिंग, चलचित्र, पथनाटय, नाटिका यासारख्‍या माध्‍यमांचा वापर करता येईल. 
केंद्र सरकारच्‍या सहयोगाने राज्‍यात राष्‍ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राबविण्‍यात येत असून धुम्रपान करणारे लोक व मुले व्‍यसनाला बळी पडुन अकाली मृत्‍यू कमी व्‍हावेत यासाठी व्‍यापक प्रयत्‍न करण्‍यात येत आहेत. या कायदयांतर्गत सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान बंदी, 18 वर्षाखालील मुलांना तंबाखुजन्‍य पदार्थ विकणे वा विकायला लावण्‍यास प्रतिबंध, तंबाखुचा प्रसार, जाहिरात व प्रायोजकत्‍व यावर बंदी, शैक्षणिक संस्‍थेच्‍या १०० यार्ड परिसरात तंबाखूविक्रीवर बंदी, तंबाखू उत्‍पादनांवर धोक्‍याच्‍या सुचना देणे यांचा अंतर्भाव होतो. शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीने दरवर्षी तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात येते. 

शालेय मुलांमधील धुम्रपान ही आज सर्वात मोठी समस्‍या असून लहान मुलांमधील व्‍यसनांचे प्रमाण कमी करण्‍यासाठी पालकांची भुमिका अत्‍यंत महत्‍वाची आहे. पालकांनी मुलांसमोर स्‍वतः व्‍यसन न करता व्‍यसनांपासुन परावृत्‍त होण्‍याचा प्रयत्‍न केला पाहिजे. कारण जेष्‍ठांचेच अनुकरण मुले करतात व परिणामी वाढत्‍या वयात मुले व्‍यसनाधीन होऊन जातात. त्‍यामुळे व्‍यसनांपासुन मुक्‍तता ही योग्‍य वयातच झाली पाहिजे. व्‍यसनांपासुन परावृत्‍त होण्‍यासाठी व्‍यायाम, प्राणायाम, योगासने, खेळ, वाचनासारखे आवडीचे छंद जोपासुन त्‍यात रममाण होणे, व्‍यसनी संगतीपासुन लांब राहणे, वैदयकीय मदत घेणे यासाखे उपाय करता येतील. शाळा व महाविदयालयीन विदयार्थ्‍यांना धुम्रपान व इतर व्‍यसनांपासुन परावृत्‍त करुन व्‍यसनमुक्‍तीकडे वाटचाल करण्‍यासाठी शिक्षक, पालक, शिक्षण संस्‍था, शासकीय व अशासकीय संस्‍था यांसह समाजातील सर्व स्‍तरातील घटकांचा सहभाग अत्‍यंत महत्‍वाचा आहे.

'व्‍यसनाला नकार तर आरोग्‍याला होकार'


वैभव मोहन पाटील
ठाणे

Comments

Popular posts from this blog

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा

डॉ. दुर्योधन चव्हाण सेवानिवृत्त