अस्मिता संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात

अस्मिता संस्थेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा
ठाणे येथील लेखक, कवी वैभव पाटील यांच्या कवितेचा सन्मान
अस्मिता साहित्य संस्कृती आणि कला मंडळ नवी मुंबई यांचे वतीने आयोजित राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ व संस्थेचा प्रथम वर्धापन दिन रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी वाशी येथील दैवज्ञ भवन हॉल येथे मोठया उत्साहात पार पडला. सदर स्पर्धेत ठाणे येथील कवी, लेखक वैभव मोहन पाटील यांना 'डिजिटल गॅप' या कवितेसाठी उत्तेजनार्थ क्रमांक देऊन गौरविण्यात आले. सदर स्पर्धेत सुविद्या करमरकर (पुणे) यांनी प्रथम, प्रिती देशपांडे (वाशी) यांनी द्वितीय तर शुभदा पाटील (झांबिया) यांनी तृतीय क्रमांक पटकावला. सदर पारितोषिके कार्यक्रमास उपस्थित असलेल्या प्रमुख अतिथी सुप्रसिद्ध कवी, बालनाटककार, सुलेखनकार, नेपथ्यकार श्रीहरी पवळे, अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद गोरे, कवी, नाटककार किरण येले, एबीपी माझा च्या भारती सहस्त्रबुद्धे, कवी, कलाकार, आरजे वैभव वऱ्हाडी यांचे हस्ते प्रदान करण्यात आली. अस्मिता प्रकाशन संस्थेचे अनावरणदेखील यावेळी पार यावेळी मान्यवरांचे हस्ते पार पडले. तसेच आर्तता ह्या प्रतिनिधीक काव्य संग्रहाचे प्रकाशन तसेच निमंत्रितांचे काव्य संमेलन देखील आयोजित करण्यात आले होते. लेखिका आणि अस्मिता मंडळाच्या अध्यक्षा सुचिता खाडे यांच्या 'एका वादळाची सांगता' ह्या कथासंग्रहाचे प्रकाशनदेखील यावेळी मान्यवरांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना कवी किरण येलें यांनी लिहिताना लेखकांचे डेडिकेशन हवे, कथा लिहिताना गडबड होत असेल तर थांबावे व काही काळाने पुन्हा लिहणे सुरू करावे असे मत मांडले. आजची तरुण साहित्यिक पिढी अत्यंत पुढारलेली आहे, ज्या अपेक्षा वाचकांच्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी ते सक्षम आहेत त्यामुळे त्यांना त्यांच्या पध्दतीने पुढे जाऊ द्यावे असे प्रतिपादन एबीपी माझा च्या भारती सहस्त्रबुद्धे यांनी केले. कवी वैभव वऱ्हाडी यांनी आपल्या मनोगतात साहित्यिकांनी भान ठेवून जबाबदारीने बोलले पाहिजे आणि समाजात जे चाललेय ते उघड्या डोळ्यांनी पाहिले पाहिजे तसेच केवळ सोशल मीडियावर जगाशी स्पर्धा करू नका तर स्पर्धा स्वतःशी करा असे मत व्यक्त केले. साहित्यिकांनी रंजनात न रमता आजूबाजूची परिस्थिती बघून साहित्य निर्मिती करावी, लिखाण केवळ मानसन्मान व पुरस्कारांसाठी करू नये तर समाजात ज्या घटना घडत आहेत त्यावर देखील लिहिले पाहिजे असे प्रतिपादन संमेलनाचे उदघाटक शरद गोरे यांनी केले. विचारमंचावरील सर्वच साहित्यिकांच्या अभ्यासपूर्ण व प्रबोधनात्मक भाषणांनी कार्यक्रम अत्यंत सुंदर आणि बहारदार झाला. कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत सुरेख व नीटनेटकेपणे गणेश खाडे आणि सुचिता खाडे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मिलिंद जोशी आणि विना कडू यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

असा किर्ती कुमार न होणे

डॉ. डी. बी. मार्ग पोलीस ठाण्यात रक्तदान शिबिर

देवघर सार्वजनिक गणेशोत्सवाचा १०० वर्षांचा वारसा